पीएम आवास योजनेचा मुद्दा पेटणार, चर्चा ठरली निष्फळ, आज चांदूर रेल्वेत आम आदमी पार्टीचे आंदोलन होणारच !

0
468
Google search engine
Google search engine

नगर परिषदला कुलुप ठोकण्याचा इशारा

पीएम आवास योजनेतील धनादेश प्रलंबित प्रकरण

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

गोरगरीबांसाठी शासनाकडून विविध योजना काढण्यात येते. मात्र प्रशासकीय अडचणींमुळे लाभार्थ्यांपर्यंत सदर लाभ पोहचत नसल्याचे चित्र आहे. चांदूर रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा दुसरा धनादेश सात महिण्यानंतरही न मिळाल्याने आम आदमी पार्टीने न. प. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात ४ जानेवारीला न. प. कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरली असुन आज ५ जानेवारीला आम आदमी पार्टीचे सदर आंदोलन लाभार्थ्यांसमवेत होणार आहे.

पीएम घरकुल आवास योजनेअंतर्गत चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत सर्वेक्षण पूर्ण करून त्यांचा तपशील व दस्तऐवज तपासून व खात्री करून ४७५ अर्जांपैकी २१५ पात्र लाभार्थी यांची विभागणी केली व ऑक्टोंबर २०१८ मध्ये अंतिम यादी तयार करून प्रस्ताव चांदूर रेल्वे नगर परिषदमार्फत शासनाला केपीएमजी संस्थेमार्फत पाठविण्यात आला. यानंतर एप्रिल २०२० मध्ये पहिला टप्प्याचा निधी वितरीत करण्यात आला. त्यानंतर लाभार्थ्यांनी आपले बांधकाम सुरू केले. मात्र सात ते आठ महिने उलटूनही दुसऱ्या टप्प्यातील धनादेश अद्याप पर्यंत मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या घरास मुकावे लागले आहे. याबाबत १६ डिसेंबरला न. प. मुख्याधिकारी यांना आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देऊन १५ दिवसाच्या आत धनादेश द्या अन्यथा नगरपरिषद ला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा दिला होता. परंतु सदर कालावधी संपल्यानंतरही या प्रकरणात कुठलीही प्रगती न झाल्याने अखेर आम आदमी पार्टीकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. घरकुल लाभार्थ्यांना घेऊन आम आदमी पार्टीकडून ५ जानेवारीला कुलूप ठोकणार असल्याचे पत्र न. प. मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना दिले. या पत्रानंतर ४ जानेवारीला स्थानिक न. प. कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, ठाणेदार मगन मेहते, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी यांच्यासमवेत आम आदमी पार्टीचे नेते तथा माजी न.प. उपाध्यक्ष नितीन गवळी व माजी सभापती मेहमुद हुसेन यांच्यात बैठक पार पडली. मात्र बैठकीत निधी मिळण्याचा ठोस कालावधी मुख्याधिकारी यांच्याकडून मिळाला नसल्यामुळे सदर आंदोलन आज ५ जानेवारीला होणार असल्याचे नितीन गवळी व मेहमुद हुसेन यांनी स्पष्ट केले. मात्र या होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासनात तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.

आज आंदोलन होणारच – नितीन गवळी

या घरकुल योजनेच्या निधी संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. परंतु याचा काहीही फायदा झाला नाही. इतर नगर पालीकेत दुसरा निधी उपलब्ध झाला असतांना चांदूर रेल्वे साठीच का निधी अडकला आहे ? म्हणजेच स्थानिक प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे. तसेच आजच्या चर्चेत सुध्दा ठोस कालावधी मुख्याधिकारी यांनी सांगितला नाही. त्यामुळे मोगम आश्वासने आम्हाला पाहिजे नाही असे रोखठोक मत नितीन गवळी यांनी व्यक्त केले.

 

निधी प्राप्त होताच वितरीत करण्यात येईल – मुख्याधिकारी वासनकर

कुलूप ठोकण्याच्या इशाऱ्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. लवकरात लवकर निधी प्राप्त होऊन लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यात येईल असे मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी सांगितले.