_कोरोना प्रतिबंधक उपाययोजना_ *पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये* *दक्षता न पाळणा-यांवर कडक कारवाई* – *पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर*

0
1019
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ९ : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे गांभीर्य ओळखून सर्वांनी दक्षता त्रिसूत्री पाळली नाही तर पुन्हा साथ वाढून लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. हा धोका वेळीच ओळखावा व सर्वांनी दक्षता त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन करतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी, दक्षता न पाळणा-यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणांना आज येथे दिले.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेत संबंधित सर्व विभागांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, पीडीएमसी अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लस आल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर आल्याचे वाटत असतानाच या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. विशेषत: अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ अधिक दिसून येत आहे. पुन्हा लॉकडाऊनची वेळ येता कामा नये. तसे झाले तर यापूर्वीच निर्माण झालेल्या अडचणींत आणखी भर पडेल. युरोपियन देशांतील साथीच्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याकडे घडता कामा नये. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स पाळणे व हातांची स्वच्छता ही दक्षता सर्वांकडून पाळलीच गेली पाहिजे. स्वत: दक्षता न पाळून इतरांचा जीव धोक्यात घालणे घातक आहे. कुणाला साथीचे गांभीर्य कळत नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. याबाबत शिस्त निर्माण करण्यासाठी सलग व सर्वदूर दंडात्मक कारवाई व जनजागृती मोहिम राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले.

त्याचप्रमाणे, या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांतून औषध साठा, उपचार सुविधा, आवश्यकतेनुसार खाटा आदी यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

गृह विलगीकरणातील रुग्णांकडून लक्षणे नसल्यास बरेचदा सोशल डिस्टन्स व इतर नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांकडून नियमभंग झाल्यास दंडाच्या सुस्पष्ट उल्लेखासह बाँड लिहून घेण्यात येईल व तसे झाल्याचे आढळताच मोठा दंड वसूल केला जाणार आहे. ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात बाधित आढळत आहेत, अशी ठिकाणे निश्चित करून तिथे रॅपीड अँटिजन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या फरकाने दिले जातात. त्यामुळे लसीकरणानंतरही काही काळ दक्षता घेणे आवश्यक असतेच. पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय व एसआरपीएफ कॅम्प येथे लसीकरणासाठी शिबिरे घेतली जातील. यापुढे लसीकरण मोहिमेचा विस्तार होऊन प्रत्येक तालुक्यात लसीकरण केंद्र सुरु करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.

000