*एस. टी. बसमध्ये ‘नो मास्क, नो टिकट’ पद्धती राबवा* *जिल्हाधिका-यांचे आदेश*

0
1408
Google search engine
Google search engine

 *तालुकानिहाय कोविड केअर सेंटर पूर्णांशाने कार्यान्वित होणार*

अमरावती, दि. 19 : कोरोना प्रतिबंधासाठी एस. टी. बसेसमध्ये ‘नो मास्क, नो टिकट’ पद्धती राबविण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना दिले.

एस. टी. बसस्थानकावर गर्दी होत असल्याच्या व प्रवासी मास्क वापरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत जिल्हाधिका-यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्याशी चर्चा केली. मास्क नसलेल्या प्रवाश्याला बसमध्ये प्रवेश देऊ नका, आवश्यक तिथे मार्शलची मदत घ्या. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बसस्थानकासारख्या ठिकाणी तर अधिक काटेकोरपणे कार्यवाही होणे गरजेचे असते. त्यामुळे स्वत: लक्ष घालून वाहक- चालकांना प्रवाश्यांकडून नियमपालन होण्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

बाधितांची संख्या वाढत असल्याने तालुकानिहाय कोविड केअर सेंटर पूर्णांशाने कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती शहरात मनपा शाळा क्र. 17 विलासनगर, मनपा शाळा नागपुरी गेट, बडनेरा पोलीस ठाण्यामागील मनपा शाळा व विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात चाचणी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. तसेच, कोविड उपचारासाठी दोन नवी रुग्णालये वाढविण्याबाबतही लवकरच निर्णय होईल. खासगी निदान केंद्रातील अँटिजेन चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. नियमभंग करणा-यांविरुद्ध महापालिकेकडून व जिल्ह्यात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही सातत्यपूर्ण मोहिम राबविण्यात येणार आहे. अमरावती पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत दहा लाख रूपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

000