“विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री व  पंतप्रधानांना शाळा सुरू करण्याचे साकडे”

0
566
Google search engine
Google search engine

आसेगाव पूर्णा –अहिल्यादेवी होळकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 5 ते 12 मधील एकूण 1200 विद्यार्थी व पालकांनी मा.मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना शाळा सुरू करण्याबाबतचे निवेदन पत्राद्वारे पाठवले.
ओमीक्रोन मुळे सुरु असलेला संसर्ग टाळण्यासाठी जी नवी निर्बंधाची नियमावली जाहीर झाली त्यात सर्व शाळा बंद करून परत ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लहान मुलांमधील संसर्गाचे सौम्य स्वरुप, या वयोगटात आजाराची कमी तीव्रता तसेच शाळेत गेल्यामुळे घरात मोठ्यांना संसर्गाचे अत्यल्प प्रमाण पाहता शाळा बंद करण्याच्या निर्णयातून मुलांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होण्यापलीकडे काहीही हाती लागणार नाही. कोरोना संसर्गाला सुरुवात होऊन दोन वर्षे उलटून गेल्याने बहुतांश लहान मुलांना लक्षण विरहित किंवा सौम्य संसर्ग होऊन गेला आहे.
ऑनलाइन शाळा ग्रामीण भागातील व राज्यातील अशिक्षित कामगार, शेतमजूर, पालकांसाठी अव्यवहार्य पर्याय आहे. ज्या पालकांचे व घरातील ज्येष्ठांचे लसीकरण झालेले आहे त्यांना मुलांना शाळेत न पाठवून त्यांच्या लसीकरणाचा हेतूच साध्य होत नाही. शाळेतील मुले घरातील मोठ्यांना संसर्गित करतील ही भीती रास्त नाही. कारण मोठ्यांना संसर्ग होण्यासाठी शाळेपेक्षा इतर अनेक स्रोत सध्या खुले आहेत. राजकीय सभा, प्रचार, लग्न, समारंभ किंवा तत्सम साजरी करणाचे सर्व कार्यक्रम राजरोसपणे सुरू असताना फक्त शाळाच बंद ठेवल्याने पालकांमधील रोष वाढत आहे.
सदर पाठविलेल्या पत्राद्वारे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या भीतीने निरक्षर राहून मेल्यापेक्षा साक्षर होऊन मरणे काय वाईट! असा टाहो या निवेदनातून फोडला आहे.