महाराष्ट्रातले कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

0
649
Google search engine
Google search engine

मुंबई: महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान मास्कचा वापर करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

राज्यातील बहुतांशी लोकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

 

दरम्यान, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध सुरू आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. आता राज्यातील कोरोना हा नियंत्रणात आल्याने राज्य मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढता येणार आहे. तसेच रमजानचा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहाने साजरी करता येणार आहे.