आज आम आदमी पार्टीतर्फे चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयावर मोर्चा ; घरकुलचा निधी त्वरीत देण्याची मागणी

0
311
Google search engine
Google search engine

 

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे मानधन लाभार्थ्यांना द्यावे

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे ४ ते ५ वर्षापासून निधीअभावी घर पुर्णत्वास गेलेले नाही. तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनेक महिण्यापासून मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे या योजनेचा निधी त्वरीत मिळावा व इतर मागण्यांसाठी आज मंगळवारी दुपारी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जनता दल (से.) पक्ष सुध्दा सहभागी होणार आहे.

चांदूर रेल्वे शहरात पहिल्या टप्प्यात २१५ घरकुले पाच वर्षापुर्वी व दुसऱ्या टप्प्यात ४०५ घरकुले दोन वर्षांपासून मंजूर झाले असून सदर घरकुलाचे काम अजून पर्यंत निधी अभावी पूर्णत्वास गेलेले नाही. प्रत्यक्षात चार ते पाच वर्षापासून चांदूर रेल्वे शहरातील एकही घरकुल लाभार्थ्याचे घर हे पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना त्वरीत निधी मिळावा तसेच शहरात जे नागरिक अनेक वर्षांपासून अतिक्रमण जागेवर राहतात त्यांना कायमस्वरूपी पट्ट्याचे मालकी हक्क प्रदान करून त्यांना सुद्धा घरकुल मिळावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. तसेच चांदूर रेल्वे तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेचे मानधन अनेक महिण्यांपासून प्रलंबित आहे. सदर लाभार्थ्यांना त्वरीत मानधन मिळावे या मागण्यांकरिता हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आज मंगळवारी दुपारी १ वाजता सिनेमा चौक येथून मोर्चाला प्रारंभ होणार असुन जुना मोटार स्टँड येथून एसडीओ कार्यालयावर मोर्चा पोहचणार आहे. व या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आमच्या मागण्या जो पर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून उठणार नाही व जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी शासन जबाबदार राहणार असुन या आंदोलनात जास्तीत जास्त लाभार्थी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी, आप नेते मेहमुद हुसैन व राजाभाऊ भैसे, जनता दल (से.) चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर भगत, संजय डगवार, आपचे तालुका संयोजक सागर गावंडे आदींनी केले आहे.