_*शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सव*_ *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ*

0
353
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ७ : स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणा-या व व-हाडाचे भूषण ठरलेल्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10 एप्रिल) दुपारी 12.30 वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख यांनी आज येथे दिली.

 

संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. साधना कोल्हेकर व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाल्या की, शुभारंभ सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून, पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी मिळणार आहे. त्यातून विद्यार्थी सुविधा गृह व इतर सुविधांची निर्मिती होईल. महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळावाही होणार आहे.

*संस्थेचा इतिहास*

_अमरावतीत उच्च शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था उभारली जावी, अशी मागणी रावसाहेब मुधोळकर व मोरोपंत जोशी यांनी किंग एडवर्ड यांच्या श्रद्धांजली सभेत 13 सप्टेंबर 1910 रोजी मांडली. त्यानंतर मध्य प्रांत व व-हाडचे मुख्य आयुक्त सर बेंजामिन रॉबर्टसन यांच्या हस्ते 23 नोव्हेंबर 1918 रोजी संस्थेच्या इमारतीच्या पायाभरणीला प्रारंभ झाला. संस्थेची इमारत पूर्ण होऊन दि. 28 जुलै 1923 रोजी संस्थेचा व पहिल्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ गव्हर्नर सर फ्रॅन्क स्लाय यांच्या हस्ते व तत्कालीन शिक्षणमंत्री रावसाहेब मुधोळकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी किंग एडवर्ड कॉलेज असे नाव होते. पहिल्या शैक्षणिक वर्षात 83 विद्यार्थी व 10 प्राध्यापक होते. संस्थेला पहिले प्राचार्य म्हणून फ्रेडरिक पेरसी टोस्टव्हिन यांच्यासारखे शिस्तप्रिय प्राचार्य 1923 ते 1941 या काळात लाभले._

संस्थेच्या जडणघडणीत दादासाहेब खापर्डे, मोरोपंत जोशी, रावबहादूर भट, दिवाणबहादूर ब्रम्ह, रा. मो. खरे, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब खापर्डे, वाय. जी. देशपांडे, न्या. मंगलमूर्ती, शिवाजीराव पटवर्धन, बॅ. रामराव देशमुख, ना. रा. बामणगावकर आदी अनेक मान्यवरांनी योगदान दिले, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

स्वातंत्र्योत्तर काळात संस्थेचे विदर्भ महाविद्यालय म्हणून नामकरण झाले. त्यानंतर 2001 मध्ये महाविद्यालयाचे रूपांतर संस्थेत होऊन प्राचार्याऐवजी संचालक पद निर्माण झाले. शासनाकडून 2003 मध्ये शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था असे नामकरण होऊन 2021 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. संस्थेत आज 22 अभ्यासक्रमांचे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी शिवानंद कुमार, डॉ. चौधरी, ग्रंथपाल श्री. चुंगडे आदी उपस्थित होते.

०००