शेतकरी पुत्र हरीष देशमुख कृषि उपसंचालक पदी.

0
753

एमपीएससी मधून राज्यात ई.डब्ल्यू.स. प्रवर्गातून पहिला येत झाली निवड.

अकोला:- बाळापूर तालुक्याच्या कवठा येथील शेतकरी गणेश भास्करराव देशमुख व शैला देशमुख यांचे पुत्र हरिष देशमुख यांची नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या निकालामध्ये महाराष्ट्रातून १५ वा क्रमांक पटकावत कृषी उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी (वर्ग-१) पदी निवड झाली आहे. या निवडीने हरिषचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे कवठा गावची मान तालुक्यातच नाही तर राज्यात उंचावली आहे. हरीषने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठा ता. बाळापूर येथे पूर्ण केले असून गावात पुढील शिक्षणाची पर्याप्त व्यवस्था नसल्याने शेजारच्या शेगांव तालुक्यातील श्री मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालय व श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगांव येथे माध्यमिक शिक्षण घेतले. वडिलांचा व्यवसाय कृषी असल्याने आपल्या वडीलांच्या कामात आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून कृषी पदवीचे शिक्षण शासकीय कृषी महाविद्यालय, नागपूर आणि पदव्युत्तर कृषी शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.अहमदनगर येथे २०२१ मध्ये पूर्ण केले.
शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करीत गेल्यावर्षी त्याची निवड कॅनरा बँक मध्ये कृषि विस्तार अधिकारी पदी झाली असून सद्या उत्तर प्रदेश मध्ये कार्यरत आहे. नोकरी करीत असताना सुद्धा त्याने अभ्यास चालू ठेवला व एमपीएससी मधून पद मिळवले. आपल्या जिद्दीने कौशल्याने हे यश पदरी पाडले यामुळे त्याचे सर्वदूर कौतुक होतं आहे. हरीष देशमुख यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडिल, बहीण, भावंड, मार्गदर्शक यांना दिले आहे. आपल्या अडचणींना दूर करत नेहमी मदत तथा मार्गदर्शन करणारे मित्र मंडळी, नातेवाईक यांचे आभार मानत हे यशाचे डोंगर गाठू शकलो असे हरीष यांनी सांगितले.