*वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा आणणा-यांविरुद्ध गुन्हा दाखल* *खनिकर्म अधिकारी पथकाची कार्यवाही*

0
907
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 30 : वाळूची अवैध वाहतूक व ती रोखण्यासाठी आलेल्या शासकीय पथकाच्या कामात अडथळा आणणा-या व्यक्ती व वाहनाचे चालक, मालक यांच्याविरोधात मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा खनिकर्म अधिका-यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यानुसार वाळूचोरांविरूद्ध दंडात्मक कारवायाही ठिकठिकाणी होत आहेत.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खा. शेख यांच्यासह पथक मंगळवारी (दि. 30 मे) पहाटे पावणेतीन वाजता धामणगाव रेल्वे, मंगरूळ दस्तगीर, गोकुळसरा, दिघी महल्ले रस्त्यावरून जात असताना दिघी महल्ले गावाजवळ त्यांना वाळूने भरलेला ट्रॅक्टर व एक टिप्पर वाहन येताना दिसले. पथकाचे वाहन पाहून ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर चालू अवस्थेत रस्त्यावर सोडून अंधारात पळ काढला. हा चालू ट्रॅक्टर पथकाच्या वाहनाच्या दिशेने येत होता. हे लक्षात घेऊन पथकाच्या चालकाने आपले वाहन मागे घेतले. पुढे तो ट्रॅक्टर पुलाच्या कड्याला जाऊन थांबला. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ते दीड ब्रास वाळू होती.

या वेळेत ट्रॅक्टरच्या मागून येणा-या टिप्परने रिव्हर्स घेऊन पळ काढला. दरम्यान, एका स्कॉर्पिओ गाडी पथकाच्या वाहनाच्या दिशेने भरधाव आली व पथकाच्या वाहनाला पुढे जाण्यास काहीवेळ अडथळा निर्माण केला. पथकासोबत पोलीस कर्मचारी पाहून या स्कॉर्पिओनेही मागे जात पळ काढला. याबाबत पथकाने मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदार यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार एफआयआर दाखल करून जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर मंगरूळ दस्तगीर पोलीसांकडे सोपवून पथक पुढे निघाले.

पुढील कारवाईसाठी पथक जात असताना गोकुळसरा- दिघी महल्ले कॅनॉल रस्त्यावर अंदाजे एक ते दोन ब्रास वाळू खाली पडलेली दिसून आली. दिघी महल्ले गावाकडे जात असताना एका टू व्हीलर गाडीनेही पथकाच्या वाहनाचा पाठलाग केला.

मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात अनुप महल्ले (रा. पेठ रघुनाथपूर), सतीश देवरकर (रा. गोकुळसरा) यांच्यासह वाहन ट्रॅक्टर स्वराज्य क्र. 744 एफई चे चालक-मालक, स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच-27- 6055 चे चालक-मालक, पल्सर ब्लॅक गाडी क्र. एमएच 27- 2201 यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानुसार रेतीचोरी भारतीय दंडसंहिता कलम 379, शासकीय कामात अडथळा करून जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडी व ट्रॅक्टर पळविल्याने कलम 353, 341 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो- फाईल