अशी ही माणुसकी ! सापडलेले १ लाख १६ हजार रूपये केले परत प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

0
607
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
आजच्या जगात अनेक लोक उधारीचे पैसे बुडवायला मागेपुढे पाहत नाही. तर कोणा अनोळखी व्यक्तीचे सापडलेले पैसे परत करण्याचा विचार करणारे मोजकेच लोक या जगात आहेत. अशाच प्रकारच्या माणुसकीचे दर्शन झाल्याचा प्रकार चांदूर रेल्वे शहरात पहावयास मिळाला. एका नागरिकाची पुतळ्याजवळ पडलेली १ लाख १६ हजार रकमेची बॅग संबंधित व्यक्तीला पोलीसांच्या मार्फत गुरूवारी रात्री परत करण्यात आली.
चांदूर रेल्वे शहरातील शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शनिवारी रात्री १ लाख १६ हजार रुपये रकमेची बॅग गुणवंत सयामे, कैलास बाबर, रितेश बाबर, शेख शफीक व मंगेश साखरवाडे या व्यक्तींना  सापडली. त्या बॅगमधील पासबुक व ओळखपत्रावरून सदर बॅग व पैसे हे विवेक गोपाल मेश्राम, रा. जळका जगताप यांचे असल्याचे समजले. सदर नागरिकांनी सापडलेली बॅग चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. पोलीसांनी बॅग असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली. जळका जगतापचे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख कौस्तुभ खेरडे यांनी सुध्दा सदर व्यक्तीच्या संपर्कासाठी प्रयत्न केले. मात्र विवेक मेश्राम हे बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला नाही. अशातच ते बुधवारी रात्री जळका जगताप गावात आले. यानंतर गुरूवारी कौस्तुभ खेरडे, पंकज कोरडे व पंकज भरडे हे विवेक मेश्राम यांना घेऊन पोलीस स्टेशनला आले. व त्या पाचही व्यक्तींच्या हस्ते ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या उपस्थितीत १ लाख १६ हजारांची रक्कम मेश्राम यांना परत करण्यात आली. यामुळे समाजात आजही माणुसकी जिवंत आहे असे चित्र दिसले.