सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक नेमणुकीच्या त्या पत्रावर सागर देशमुखांचा आक्षेप , तरुणांना सरकार वाकुल्या दाखवत असल्याचा आरोप ; आंदोलनाचा इशारा

0
469
Google search engine
Google search engine

 

Amravati :-
: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासंदर्भातील परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै रोजी जारी केली आहे. या परिपत्रकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना गटाचे पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. देशात तरुणाईची संख्या मोठी आहे. त्यांना रोजगार मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या देखील वाढवत आहे. अशा स्थितीत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर सेवा घेऊन सुशिक्षित तरुणांना दुर्लक्षित करणे म्हणजे सरकारकडून तरुणाईला वाकुल्या दाखवत असल्याचा गंभीर आरोप देखील सागर देशमुख यांनी करत सदर परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै रोजी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर सेवा घेण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकावर आता चहुबाजूंनी विविध संघटनांकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी वयोमर्यादा ही ७० वर्ष करण्यात आली आहे. त्यांना वीस हजार रुपये मानधन सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. अशा स्थिती डीएड, बीएडकरून घरी बसलेल्या सुशिक्षित तरुणाईवर हा अन्याय असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना सचिव सागर देशमुख यांनी केला आहे. सरकारचे खाण्याचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तरुणाईला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिल्या जात असल्याच्या बाता मारत आहेत. तर राज्य शासन देखील तरुणाईला रोजगार देत असल्याचा खोटा आव आनत आहे. या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांना जनता आता बळी पडणार नाही. ७ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर सेवा घेणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला सरकारकडून वाकुल्या दाखल्या जात आहेत. त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम होत आहे. शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही. ज्यांच्या हाताला काम नाही, ज्यांचा जगण्याचा व भाकरीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, अशा तरुणाईला बाजूला करत ज्यांनी गल्लेलठ्ठ पगार घेत मोठी आर्थिक पुंजी जमवली अशांचीच सेवा घेणे म्हणजे गरज नसलेल्यांनाच रोजगार देणे असा हल्लाबोल देखील सागर देशमुख यांनी केला आहे. सरकारने सदर परिपत्रक तातडीने रद्द करावे व तरुणाईला न्याय द्यावा. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले जाणार असल्याचे सागर देशमुख यांनी म्हटले आहे.

 तर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही :- 

शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणाईवर अन्याय करणारे शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक शासनाने तातडीने रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती सागर देशमुख यांनी दिली आहे. सदरचे परिपत्रक रद्द न केल्यास आपण अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात या विरोधात मोठे जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.