​अमरावतीला लवकरच शासकीय वैद्यकीय महाविदयालय मिळेल  -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

0
988
Google search engine
Google search engine

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

पालकमंत्र्यांची  मुख्यमंत्र्यांसह चर्चा


अमरावती :-  अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली.

पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैदयकीय महाविद्यालयाबाबत अनुकुलता दर्शवली.

अमरावती हे महसूली विभागाचे ठिकाण असूनही अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अमरावतीच्या तुलनेत छोट्या असलेल्या अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या शहरांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे लक्षात घेऊन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे, असे श्री. पोटे-पाटील यांनी चर्चेत सांगितले. त्यावेळी या मागणीला मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दाखवली.

पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लागणाऱ्या पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी जून महिन्याच्या शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पूर्व पाहणी केली.  त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अमरावतीत उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे याप्रश्नी सकारात्मक असल्याने अमरावतीला लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळेल, असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.