आबासाहेब हे विधान सभेसाठी गर्व आणि आनंद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
694
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –

 

महाराष्ट्र विधानसभा दिवसाच्या कामकाजाचा क्र. सात मध्ये सभागृह नेते यांचा प्रस्तावा मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शेकाप ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांचा अभिनंदन प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. “आबासाहेब” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकाप ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांना मान दिला. शेती, कष्टकरी समाज, पाणी अशा ग्रामीण भागातील मूलभूत समस्यांची मुद्देसूद मांडणी करून त्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ध्येयनिष्ठा, तत्वनिष्ठा, साधेपणा जपून जनतेशी बांधिलकी जपणारे देशमुख हे नवीन पिढीला मार्गदर्शक ठरणारे भीष्म पितामह आहेत, तसेच आबासाहेब हे विधान सभेसाठी गर्व आणि आनंद आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी आ. देशमुख यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेतला. विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलने, चळवळ, कारावास या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरूवात करणारे आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचा दहा वेळा निवडून येण्याचा विक्रम मोडीत काढणारे देशमुख हे महाराष्ट्र विधानसभेतील भीष्म पितामह आहेत. दुष्काळी भागाच्या आणि कष्टकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने झटणारे देशमुख हे चार राजकीय पिढ्यांशी जोडलेले असून विषयाची मुद्देसुद मांडणीची त्यांची हातोटी नवीन सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. टेंभू, म्हैसाळ प्रकल्पाच्या माध्यमातून सांगोला सारख्या दुष्काळी भागास पाणी मिळविण्याच्या प्रयत्नांबरोबरच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची सोडवणूक करताना राज्याला दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. दुष्काळी भागातील सूत गिरणी यशस्वीपणे चालविण्याबरोबरच त्यांनी फळबाग योजनांच्या माध्यमातून हा भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आता डाळींब तसेच सफरचंद, बोर निर्यात करण्यापर्यंत या भागाने मजल मारली आहे. या परिसरात झालेल्या विकासकामांमुळे त्यापूर्वी ‘माण’देशातून होणारे स्थलांतर थांबल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. आपल्या ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत चार वर्षे मंत्रीपदी तर ५१ वर्षे विरोधी पक्षात राहिलेल्या देशमुख यांनी विधीमंडळातील विविध समित्यांमध्ये काम पाहिले आहे. मंत्री असताना देखील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी तळमळीने केले. राज्यपालांमार्फत सर्वाधिक तीन वेळा हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले ते एकमेव सदस्य असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. आपल्या कारकिर्दीच्या माध्यमातून राज्याला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे तसेच राज्याला त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यापुढेही प्राप्त व्हावे, अशा शब्दात शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या या अभिनंदनाच्या ठरावावर विधानसभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य आशिष शेलार, दिलीप वळसे पाटील तसेच विधानपरिषदेत सदस्य सुनील तटकरे, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, डॉ. नीलम गोऱ्हे, कपिल पाटील आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.