जलयुक्त शिवारामुळे शेतकऱ्यांच्या विहीरींना मुबलक पाणी दूष्काळ सदृष्य परिस्थितीवर ह्या योजनेची मात जलसंधारणमंत्री ना. श्री राम शिंदे यांचे वक्तव्य

0
753
Google search engine
Google search engine

शहेजाद खान /चांदुर रेल्वे –

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे. यंदा अपु-या पर्जन्यमानाची झळ कमी करण्यात योजनेतील कामे महत्वपूर्ण ठरली. हे अभियान यापुढेही अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.श्री राम शिंदे यांनी आज चांदुर रेल्वे येथे दिले.

चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या बंधारे आदी कामांचे जलपूजन जल संधारण मंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, उपविभागीय अधिकारी वनश्री लाभसेटवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रताप अडसड, धानो-याच्या सरपंच भारती नरसेकर, चंद्रमणी गजभिये यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जल संधारण मंत्री श्री शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळण्यास मदत होत असून, कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. हे अभियान यापुढे अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल. योजनेतील कामांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शेतक-यांना सतत प्रोत्साहित केले पाहिजे. योजनेतील कामांचा गुणात्मक दर्जा कायम राहिला पाहिजे. त्यामुळे कामातील गुणवत्ता न राखणा-या कंत्राटदारांवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांतील साठवण बंधा-यांच्या कामांचे जलपूजन झाल्यानंतर जल संधारण मंत्री शिंदे यांनी गावक-यांशी चर्चा करुन त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष श्री दिनेश सूर्यवंशी , श्री प्रतापदादा अडसड , भाजप तालुका अध्यक्ष श्री रवींद्र उपाध्याय, शहर अध्यक्ष प्रमोद नागमोते, माजी भाजपा तालुका अध्यक्ष बबनराव गावंडे, संजय पुनसे, उत्तमराव ठाकरे, श्री डॉ प्रदीपजी शिंगोरे , व समस्त सरपंच आणि जुने कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते