येरड (बाजार) येथे सापडलेला लावारीस गांजा कुणाचा? – तळेगाव पोलीसांना अजुनही नाही लागला सुगावा

0
620
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) या गावाजवळील बेंबळा नदीच्या धरणाच्या काठावर शुक्रवारी सव्वा सहा लाखांचा लावारीस गांजा आढळल्याने एकच खळबळ माजली होती. परंतु दोन दिवसानंतरही या प्रकरणाचा तळेगाव पोलीसांना सुगावा लागला नसल्याची माहिती मिळाली आहे.
    चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील बेंबळा नदी धरणाच्या काठावर झुडपामध्ये शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता ओला गांजा आढळून आले होते. ही गुप्त माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळतात ठाणेदार उपाध्याय, धामणगाव रेल्वेचे ठाणेदार लांडे व नायब तहसीलदार सवई यांनी घटनास्थळ गाठून सदर माल ताब्यात घेतला. या गांज्याचे वजन १ क्विंटल २४ किलो ८९० ग्रॅम असून अंदाजे किंमत ६ लाख २४ हजार ६७० रूपये आहे. तळेगाव पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. परंतु दोन दिवसानंतरही सापडलेला गांजा कुणाचा? याचा शोध लागलेला नाही.  सदर गांजा सापडण्याच्या केवळ दोन तासांपुर्वी छत्तीसगड पोलीसांनी याच परिसरात येऊन एका महिला गांजा तस्करला अटक केली होती. अनेक दिवसांपासुन गांजा चा अवैध धंदा या परिसरात सुरू असतांना या महिलेला अटक झाल्यानंतर दोन तासानंतरच लावारीस गांजा कसा सापडला हा सुध्दा एक संशोधनाचा विषय असल्याची चर्चा परीसरात सुरू होती. या अवैध धंद्याबाबत तळेगाव पोलीसांचे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे तळेगाव पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा सुगावा कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असुन तळेगाव पोलीस चौकशी करीत आहे.