पहिल्याच पावसाचे पाणी घुसले घुईखेडमधील घरांत – बेंबळा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावाची लागली वाट

0
759
Google search engine
Google search engine
( फोटो – शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे –
        पुनर्वसित गावांत सर्व सुख सोयी शासनातर्फे पुरविणे गरजेचे असते व पुनर्वसित गावांत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. परंतु बेंबळा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या वेळकाळू धोरणामुळे तालुक्यातील घुईखेड या पुनर्वसित गावात सोयी सुविधांचा फज्जा उडाला आहे. पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घुईखेड गावाची वाट लागली असुन पहिल्याच पावसात गावातील अर्ध्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या पावसामुळे अख्खे गाव तर पाण्याखाली जाणार नाही ना?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.
        यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी पुनर्वसनात तालुक्यातील घुईखेड या गावचे पुनर्वसन गेल्या ११ वर्षापुर्वी झाले. परंतु गावात सोयी सुविधेचा अभाव ठरला आहे. शनिवारी तालुक्यात मान्सुनपुर्व पावसाने धूव्वाधार हजेरी लावली. याच पावसाचे पाणी घुईखेड येथील प्रकाश मुळे, धीरज नेवारे, श्रीराम संसारे, सुनंदा मुळे यांच्यासह पुनर्वसन मधील ४५ ते ५०% लोकांच्या घरात घुसले. गावात भूखंड वाटप करतांना जागेची लेवल न करता ज्या स्थिती आहे त्याच स्थितीत भूखंड वाटप अधिकाऱ्यांनी केले असून साध्या नाल्यांचाही उतार काढलेला नाही. नाली मधील पाणी सुध्दा बाहेर काढलेले नसुन काही नाल्यांचे पाणी थेट नागरीकांच्या घरांत घुसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात घुसत आहे. काही नाल्यांचे पाणी गावाबाहेर न जाता ते पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या विहीरीत जात असल्याचे नागरीकांनी सांगितले. यामुळे गावांतील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वांत पहिले नाल्यांचे व्यवस्थित उतार काढून त्या पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे. अन्यथा पुढे असाच जोरदार पाऊस आल्यास अख्ख्या घुईखेड गावात सुध्दा पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी सदर गावाची पाहणी करून गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासुन मुक्त करावे व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.