इंडिया पोस्ट पेमेंट या डिजिटल बॅंकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

0
1256
Google search engine
Google search engine

चीफ पोस्ट जनरल ऑफ महाराष्ट्र एच.सी.अग्रवाल यांनी यांनी दिले कार्यक्रमाचे निमंत्रण

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

मुंबई, दि.14 : महाराष्ट्रात इंडिया पोस्ट पेमेंट या डिजिटल बॅंकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील भारतीय डाक कार्यालयात 21 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चीफ पोस्ट जनरल ऑफ महाराष्ट्र एच.सी.अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी आज भेट घेतली.

भारतात पहिल्यांदाच एकाच वेळी 3 हजार 250 डाक कार्यालयांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट या डिजिटल बॅंकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील 40 शाखा आणि 200 प्रवेश केंद्राचे एकाच दिवशी उद्घाटन संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणार आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला विश्वासू वाटणारी, कायम सेवेत उपलब्ध असणारी आणि परवडणारी कॅश लेस असणारी “इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक” भारतीय डाक कार्यालय नागरिकांसाठी सुरू करीत आहे.

या डिजिटल बॅंकेमुळे सामान्यांना कुणाचाही हस्तक्षेप किंवा मदत न घेता आपले खाते सुरू करता येणार आहे. पोस्टमास्तर घरोघरी जाऊन याबाबत सहकार्य करणार आहेत. यामुळे कोणतेही डिजिटल आर्थिक व्यवहार, खरेदी -विक्री, लाईट बील, टेलिफोन बील आदींसारखे व्यवहार करता येणार आहे. शासकीय योजनांचे अनुदानही या बॅंक खात्यातून प्राप्त होण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

हा या उप्रकमाचा पहिला टप्पा असून डिसेंबर 2018 पर्यंत 1 लाख 30 हजार डाक कार्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विविध टप्प्यात देशातील एकूण 1 लाख 55 हजार डाक कार्यालयात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी मुख्य डाक सेवेच्या संचालक सुमिता अयोध्या, मुंबई क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, वरिष्ठ अधीक्षक रूपेश सोनावले उपस्थित होते.