महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन.

0
823
Google search engine
Google search engine

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झालं असुन वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जसलोक रुग्णालयात वाडेकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं क्रिकेट विश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. परदेशी भूमीवर भारताला विजयाची सवय लावून देणारा कर्णधार अशी वाडेकर यांची ओळख होती. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं परदेशात पहिली कसोटी मालिका जिंकून दिली. 1971 मध्ये वाडेकरांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा त्यांच्याच मायदेशात पराभव केला. 1958 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या वाडेकरांनी 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1966 ते 1974 या कालावधीत वाडेकर भारतीय संघाकडून खेळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते एकूण 37 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी एक शतक आणि चौदा अर्धशतकं झळकावली. परदेशी जमिनीवर भारतीय संघाला जिंकायची सवय लावून देणारा कर्णधार अशी अजित वाडेकर यांची ओळख आहे.

वेस्टइंडिज आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना त्यांच्याच जमिनीवर खडे चारायची किमया वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं करुन दाखवली. आक्रमक फलंदाज आणि स्लिपमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही ते ओळखले जायचे.बहुतेकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला येणाऱ्या वाडेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 113 धावा केल्या. भारत सरकारनं 1967 मध्ये अर्जुन पुरस्कारानं त्यांचा गौरव केला होता. तर 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.