बाप्पा, आम्हाला माफ कर

0
780
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)
एवढं वाइट मला आजवर कधीच वाटलं नव्हतं, जितकं अनंत चतुदर्शीला वाटलं. मी चक्क स्वत:ला शिव्या घालत होतो. आणि त्यांनाही शिव्या घातल्या, ज्यांनी ते केलं होतं. मी शिव्या घालण्यावाचून काहीच करत शकत नव्हतो. म्हणून आज जड अंत:करणाने मी लिहीतोय. मला माहित नाही, माझं हे लिहणं किती जणांना पटेल, किती जणांना रूचेल. तरीही मी माझ्या भावनांना आज वाट मोकळी करून दिलीय.

ज्या बाप्पाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो… ज्या बाप्पाच्या आगमनाने अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण प्रसन्न होतं… ज्या बाप्पाची आपण दहा दिवस मनोभावे सेवा करतो, पूजा-अर्चा करतो… ज्या बाप्पाला निरोप देताना आपले डोळे आपसूकच पाणावतात. त्याच बाप्पाला गिरगाव चौपाटीवर निरोप देताना माझ्या पायाखाली चिरडावं लागलं. हे मनाला पटतच नव्हतं. माझ्यासारख्या हजारोंच्या पायाखाली बाप्पा चिरडले जात होते. अनावधानाने का होईना कुणाचा पाय बाप्पाच्या छातीवर पडत होता तर कुणाचा सोंडीवर… कुणाचा डोक्यावर तर कुणाचा पोटावर…

माझ्याबरोबर असंख्य गणेशभक्त चौपाटीवर आले होते. लालबागचा राजासह किमान दहाएक मोठ्या मूर्त्या विसर्जनासाठी चौपाटीवर होत्या. राजाला निरोप देण्यासाठी माझ्यासह हजारो भक्त म्हणा किंवा नागरिक म्हणा, दोन-तीन फूट पाण्यात होते. एकीकडे आम्ही राजाची पूजा करत होतो तर दुसरीकडे समुद्रात विसर्जित केलेल्या मूर्त्या किनाऱ्यावर आल्यामुळे त्या भाविकांच्या पायाखाली चिरडल्या जात होत्या. भाविकांची इतकी प्रचंड गर्दी होती की मूर्ती दिसण्याआधीच भाविकांच्या पायाखाली त्या चिरडल्या जात होत्या. बहुतांश मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या भंगलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर पडल्या होत्या. मी पाण्यात असताना खूप सांभाळून सावधपणे पाय टाकण्याचा प्रयत्न केला, पण मी पाय उचलताच माझ्या पायाखाली बाप्पा चिरडले जात होते. मी तब्बल नऊवेळा पडलो. अनेक भाविक बाप्पा पायाखाली आल्यामुळे उताणे पडले. तिथे आलेल्या प्रत्येकाच्या पायाखाली बाप्पा चिरडले जात होते. ते बाप्पांवर पडत होते. मला कळतच नव्हतं नक्की काय चाललंय ते. मी स्वत:ला फार मोठा पापी समजू लागलो. माझ्याकडून जे झालं ते अनावधानाने असलं तरी ते करणारे माझेच बांधव आहेत ना. त्याचा मला खूप त्रास झाला. मग माझ्या बाप्पाला माझ्या माझ्यामुळे जो त्रास झाला, माझ्यासारख्या हजारो भाविकांपासून त्रास झाला, त्याबद्दल मी माफीही कशी मागू…??? याची लाज वाटतेय मला.

ज्या बाप्पाची आपण मनोभावे पूजा करतो, त्याच बाप्पाचा विसर्जनाला आमच्याकडूनच अशाप्रकारे अपमान होत असेल तर तो आम्हाला शिक्षा का देत नाही… ??? गणपतीच्या मूर्त्या शाडूऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस व अन्य रासायनिक पदार्थांनी बनविण्यात येत असल्यामुळे त्या विसर्जनानंतर विरघळतच नसल्यामुळे गेली अनेक वर्षे हे होतंय. गेले कित्येक वर्ष काही समाजसेवी संस्था प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणा म्हणून न्यायालयात लढा देत आहेत. माझं त्या गोष्टीकडे कधीच लक्ष गेलं नव्हतं, पण काल गिरगावला पायाखाली बाप्पा चिरडले गेले तेव्हा मला त्यांच्या लढ्याबद्दल तीव्र जाणीव झाली. आमचे बांधव प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घडवून किती पाप करत आहेत, याची प्रथमच जाणीव झाली आणि माझ्यासह हजारो भाविक त्यांच्या पापाचे भागीदार बनलो. पण लोकांचं यांच्याशी काही घेणेदेणे असते का??? प्लास्टर ऑफ पॅरिसने समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतेय. समुद्रातल्या जीवांना याचा त्रास होतीय, पण इथे कुणाला कसली पडलेलीच नाही.

आपले शरीरच घ्या. आपण एखादी वाइट गोष्ट खालल की आपले शरीर ते ताबडतोब बाहेर फेकतं. तसंच समुद्राचंही आहे. शाडूच्या मूर्त्या समुद्रात विरघळतात. पण प्लास्टरच्या मूर्त्या जशाच्या तशाच राहतात. जेव्हा विसर्जित केलेल्या मूर्त्या छिन्नविच्छिन्न अवस्थेत पुन्हा किनाऱ्यावर येतात. तेव्हा समुद्र किनाऱयांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसते. वर्षेनुवर्षे आपलं हे असंच विसर्जन सुरू आहे. काळाप्रमाणे आपल्यालाही बदलायला हवं होतं, पण आपल्या बदलाचा वेग खूपच मंद आहे. काही वर्षापूर्वी समुद्राऐवजी कृत्रिम तलावात विसर्जनाची पद्धत सुरू करण्यात आली. आधी काहींनी या विसर्जनाला विरोध केला, मात्र कालांनतराने लोकांना विसर्जनाची ही पद्धत पटायला लागलीय. एवढेच नव्हे तर आता अनेक गणेशभक्तांनी घरीच बाप्पांचं विसर्जन करण्याची पर्यावरणपूरक पद्धत सुरू केलीय. अशा विसर्जनाचंही समाजाकडून कौतुक केलं जातंय.

असो, घरगुती बाप्पा पायाखाली चिरडल्यानंतर मी पुढचं दृश्य जे दृश्य पाहिलं, तेसुद्धा तितकंच भयंकर होतं. मुंबईत उंचच उंच मूर्त्यांची परंपरा आहे. आज प्रत्येक विभागात 50-100 मंडळं असतात आणि बहुतांश मंडळ उंचच उंच मूर्त्यांची प्रतिष्ठापणा करतात. गणेशोत्सव आपला सण आहे आणि तो दणक्यातच साजरा झाला पाहिजे.हे माझे प्रामाणिक मत आहे. पण काल गिरगावला जे दिसलं ते माझ्या मनाला पटतंच नव्हतं. माझं उंच मूर्त्यांना आक्षेप नाही, पण त्या मूर्त्यांचं व्यवस्थित विसर्जन करणे, ही त्या मंडळाची जबाबदारी नाही का…? अनेक मंडळानी आपल्या बाप्पाच्या मूर्तीला किनाऱयावरच विसर्जित करण्यात धन्यता मानली. काही मंडळ अशी होती का त्यांना बाप्पाचं विसर्जनच जमले नाही आणि ते उंच मूर्ती किनाऱयावरच सोडून गेले. ज्या राजा-महाराजा मंडळांनी किनाऱयापासून अवघ्या 100-150 मीटर अंतरावर आपल्या मूर्त्या विसर्जित केल्या होत्या. (सरळ शब्दांत सांगायचं तर उंच मूर्त्यांना दीड मीटर पाण्यात पाडून विसर्जन केलं होतं) त्या भंग पावलेल्या मूर्त्यांना विसर्जनानंतर सकाळी जेसीबीने उचललं जातं होतं. त्यावेळी मूर्त्यांची अवस्था पापण्या ओल्या करत होत्या. विसर्जनाच्या दिवशी लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीसारखी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी मंडळंच तराफ्यावरून बाप्पाच्या उंच मूर्तींचं खोल समुद्रात विसर्जन करतात, हे दिसलं. म्हणजे 10 ते 15 फूट उंचीच्या मूर्त्यांचं तराफ्यावरून व्यवस्थित विसर्जन करता येतं, हे सत्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.

मला मूर्तींच्या उंचीच्या वादात पडायचं नाही. ज्या बाप्पाची आपण मनोभावे पूजा करतो, त्याची दणक्यात भव्य मिरवणूक काढतो. त्याचं विसर्जन व्यवस्थित व्हावं, ही माझ्यासारख्या सामान्य गणेशभक्ताची इच्छा आहे. हीच इच्छा प्रत्येक गणेशभक्ताची असायला हवी. ज्या मंडळांना मूर्तींचं व्यवस्थित विसर्जन करता येत असेल, त्यांनीच उंच मूर्त्यांची प्रतिष्ठापणा करावी. मात्र अन्य मडळांनी मूर्त्यांच्या उंचीबाबत जरूर विचार करावा. घरगुती गणपती हे शाडूच्याच मूर्तीचेच असायला हवेत. एकीकडे आम्ही प्लास्टिकवर बंदी आणण्याची भाषा करतो. मिरवणूकीला डी.जे.ची परवानगी नाही दिली तर आंदोलन छेडतो. मग बाप्पाची मूर्तीही शाडूचीच असावी, असा आमचा आग्रह का नाही ? सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न अद्याप मार्गी का लावला नाही, हासुद्धा एक प्रश्न आहे. मोठ्या मंडळांनाही 20-25 फूटी बाप्पांना तीन-चार फूट पाण्यात पाडून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्याचे समाधान कसे मिळते, ते बाप्पाच जाणे.

विसर्जनानंतर समुद्र किनारे, नदी आणि तलाव स्वच्छ करण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून कैक कोटींचा खर्च होतो. जर सरकारनेच मूर्तीकारांना स्वस्तात शाडूची माती उपलब्ध करून दिली तर विसर्जनानंतर किनारे-तलाव-नदी सफाईसाठी केला जाणारा खर्च नक्कीच कमी होईल. पण हे आमच्या सरकारी यंत्रणेला, गणेशभक्तांना कळत कसं नाही. विसर्जनानंतरची परिस्थिती पाहून मी फार दुखी झालोय. हेच दृश्य प्रत्येक विसर्जन स्थळावर पाहायला मिळतं, याचीही मला खात्री पटलीय. मला माहित नाही, हे इतके वर्ष कसं होतंय. आणखी किती काळ हे असंच सुरू राहिल, याचीही मला कल्पना नाही. पण माझं बाप्पाकडे एकच साकडे आहे. हे बाप्पा, आम्ही जशी तुझी मनोभावे पूजा करतो, तसंच तुझं भावपूर्ण विसर्जनही आमच्याकडून करवून घे. जे पाप आमच्याकडून आजवर घडत आलंय. त्यासाठी आम्हाला माफ कर आणि आम्हां सर्वांना सुबुद्धी दे.

तुझा भक्त

मंगेश वरवडेकर