चांदूर रेल्वे वन परिक्षेत्राच्या वतीने शहरातून वृक्षदिंडी-आमदार वीरेंद्र जगताप यांची उपस्थिती

0
578
Google search engine
Google search engine
वन महोत्सव २०१९ रोपे आपल्या दारी विक्री केंद्राचे उद्घाटन
आयटीआयसह सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक झाले शामील
चांदूर रेल्वे –
वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी झाल्याने वातावरणात बदल तसेच प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने वृक्ष लागवड व संवर्धन करून होणारे बदल प्रदूषण आणि नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्राच्या वतीने शनिवारी सकाळी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये आयटीआय सह अनेक शाळा – महाविद्यालयाचे विद्यार्थी शामील झाले होते.
 चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे शनिवारी सकाळी 8  वाजता आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते वृक्ष दिंडीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र इंगळे, नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, नगरसेवक प्रणव भेंडे, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा धांदे, गटशिक्षण अधिकारी उमप, हेमंत राणे आदींची उपस्थिती होती. या वृक्ष दिंडीमध्ये शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जिल्हा परिषद हायस्कूल, बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल, मन्नालाल गुप्ता विद्यालय, शाहू महाविद्यालय यांसह अनेक शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी सामील झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘कावळा म्हणते काव काव एक तरी झाड लाव’, ‘माकड म्हणते हूप हूप वृक्ष लावा खूप खूप’ असे नारे देत जनजागृती केली. या वृक्षदिंडीमध्ये चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र व सामाजिक वनीकरण चे सर्व कर्मचारी सामील झाले होते. वृक्षदिंडी ही वनपरिक्षेत्र कार्यालय चांदूर रेल्वे येथून जुना मोटर स्टँड, गाडगेबाबा मार्केट, पोलीस स्टेशन मार्गासह शहरात अनेक नगरातून फिरून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे नारे देत जनजागृती केली तर आमला विश्वेश्वरच्या चंदनशेष महिला भजन मंडळाने भजनातून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले. यानंतर ही वृक्षदिंडी शेवटी जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणात आली. याठिकाणी आरएफओ कोकाटे व तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्व पटवुन देत झाले लावुन जगविण्याबाबतचे मार्गदर्शन केले. यानंतर ही दिंडी विसर्जीत करण्यात आली. यामध्ये आयटीआयचे शिल्प निदेशक कैलास चौधरी, एस.टी. बेहरे, एस. एस. कांबळे, सुरज चांदूरकर, शहेजाद खान, भुषण खेडकर यांचाही सहभाग होता.