*महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मांडल्या शेतकऱ्याच्या मागण्या*

0
777
Google search engine
Google search engine

*मुंबई:-*

*२० नोव्हेंबर*

हवामानावर आधारित फळ बागावर विमा सुधारित करणेबाबत तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या चौथा हिस्सा तातडीने देणेबाबत डॉ. अनिल बोंडे यांनी 18 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ओल्या दुष्काळाची मदत दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले परंतु 35,000/- रुपये एवढीच मदत प्रति हेक्टरी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.

15 जून ते 15 जुलै यादरम्यान तहसीलदाराच्या नोंदीप्रमाणे 120 मी.मी. पेक्षा कमी पाऊस नोंदविल्या गेल्याने हेक्टरी 35,000 /- रुपये लाभ अपेक्षित होते. परंतु बजाज अलायन्स या विमा कंपनीने वरुड तालुक्यात विविध मंडळाने सदर कालावधीमध्ये 120 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे स्कायमेटच्या आधाराणे दर्शविल्याने विमा लाभधारकाना फक्त 11,700/- रुपये प्रति हेक्टरी जाहीर केला. तहसीलदारांच्या पर्जन्यमापक नोंदी या दुष्काळग्रस्त भागासाठी ग्राह्य धरले जातात. स्कायमेटच्या चुकीच्या नोंदीवर आधारून शेतकऱ्याच्या विमा लाभाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विमा कंपनी ने पर्जन्यमापकाच्या नोंदी ग्राह्य धरून 35,000/- रुपये लाभ शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी राज्यपाल महोदयाना केली.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, शेंदूरजनाघाट या तिन्ही शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना तीन हप्ते प्राप्त झाले आहे. परतु चौथा हप्ता वितरित न केल्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घर भाडे भरावे लागत आहे. तसेच घर पूर्ण न झाल्यामुळे अतोनात हाल होत आहे. या आवास योजनामधील घरकुलाचे काम पूर्णत्वास आणण्याकरिता चौथा हप्ता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली.
या सर्व समस्यांची दखल घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील असे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना सांगितले.