चांदूर रेल्वेत विनाकारण फिरणाऱ्यांच्या ४० दुचाकी जप्त – दुचाकीवरील नागरिकांनाही केले डिटेन

0
809
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे पोलीसांची कारवाई
चांदूर रेल्वे –
कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संचारबंदी काळात विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बुधवारी कारवाईचे हत्यार उपसले आहे. या कारवाई अंतर्गत नाकाबंदी करून ४० दुचाकी जप्त करून त्यांच्या वाहनचालकांना मुंबई पोलीस कायदा कलम ६८ अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान प्रवासी वाहतुक व सरकारी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. तरीही अनेकजण विनाकरण दुचाकीवर फिरताना दिसतात. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर चांदूर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीसांनी नाकाबंदी करीत जवळपास ४० वाहने जप्त केली. व यांच्या चालकांनाही ताब्यात घेतले होते. त्यांना बाहेर ठराविक अंतरावर चुन्याने गोल आखुण पोलीस स्टेशन च्या बाहेरील आवारात बसविण्यात आले. यांवर मुंबई पोलीस कायदा कलम ६८ अंतर्गत कारवाई करण्यात आली. अनेकांजवळ चालक परवाना, गाडीची कागदपत्रे आढळून आली नाही. या सर्वांना दंड देण्यात आला. समज देऊन काही तासानंतर यांना सोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी विनाकरण वाहनाने फिरू नये, घरी सुरक्षीत राहुन प्रशासनाला सहकार्य करावे व ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले. या कारवाईमध्ये ठाणेदार दीपक वानखडे, सहाय्यक ठाणेदार गिता तांगडे यांच्यासह एएसआय मनोहर जाधव, शंकर ढोले, संदिप शिरसाट, गणेश घुले, रूपेश धारपवार, विनोद वासेकर, राजेंद्र लांडगे, मनोज वानखडे, सुरेंद्र वाकोडे, शेख गणी व सैनिक मारबदे या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.