*अमरावती ब्रेकिंग :- बोगस कागदपत्राव्दारे लाटला “शिवभोजन थाळी” चा कंत्राट –  गुन्हा दाखल करण्याची मागणी*

0
1296
Google search engine
Google search engine

 

स्वप्निल मानकर व सुमेध सरदार यांची तहसीलदार व अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

अमरावती :- (प्रतिनिधी)

शहरात दररोज बाहेरून येणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे गरजू व गरिबांना अल्पदरात जेवण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेले “शिवभोजन थाळी” केंद्र तालुकास्तरावर सुध्दा सुरू करण्याची घोषणा केली होती. याच धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सुध्दा संताबाई यादव नगरात सुरू झालेल्या शिवभोजन थाळीला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे दाखल करीत शिवभोजन थाळीचा कंत्राट लाटल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख स्वप्नील मानकर व कंत्राटदार सुमेध सरदार यांनी केला. व त्याचा पुरावा देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चांदूर रेल्वेचे तहसीलदार व अमरावतीच्या अन्न व औषध प्रशासनाकडे बुधवारी केली.

महाआघाडीचे सरकार बसल्यानंतर या आघाडीच्या वतीने गोरगरीबांसाठी १० रुपयात पूर्ण जेवण अशा पद्धतीने शिवभोजन थाली संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली. तर कोरोनाच्या काळात केवळ ५ रूपयांत जेवन मिळत आहे. त्यात प्रत्येक थाळीमागे शासन अनुदान देणार असल्याने त्याला एका हॉटेल व्यवसायाचेच स्वरूप आले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार यांना या माध्यमातून रोजगार ही प्राप्त होत आहे. परंतु चांदूर रेल्वे शहरात गेल्या महिन्याभरापासून ही योजना सुरूच झाली नाही, तर आता कोरोनाच्या संकटात विविध स्तरातून या शिवभोजन थाळीचे मागणी वाढली असतांना स्थानिक प्रशासनाने दोन दिवसातच सर्व कार्यवाही पार पाडत याचा करार दिला. परंतु त्यासाठी कुठलीही सार्वजनिक जाहिरात किंवा नोटीस न काढता किंवा पुरेसा वेळ न देता शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांना फोन करून बोलावून घेत त्यातील एकाला याचा करार देण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला होता. सदर कंत्राटदाराने अन्न व प्रशासन यांच्याकडून मिळत असलेले प्रमाणपत्र हे घरीच तयार केले असून ते खोटे आहे, संबंधिताला तसे कुठलेही प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने दिले नसल्याचा खुलासा पत्र अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाकडून शिवसेनेचे शहरप्रमुख स्वप्नील मानकर व कंत्राटदार सुमेध सरदार यांनी आणले. तसेच संबंधीताने दाखल केलेल्या प्रमाणपत्रात अनेक त्रुटी असून ते बनावट असल्याचे लक्षात येत असल्याची माहिती तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून संबंधित कंत्राटदाराचे कागदपत्र तपासून त्याचा कंत्राट रद्द करावा आणि शासनाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी स्वप्नील मानकर व सुमेध सरदार यांनी वेगवेगळ्या दिलेल्या तक्रारीतुन केली आहे.

तहसीलदारांनी हेतुपुरस्पर अन्याय केला

शहरातील अनेक गरजुवंतांनी व बेरोजगारांनी या शिवभोजन थाळी करारासाठी अर्ज केले होते. परंतु आमचे सर्व अर्ज अवैध ठरवीत बनावट कागदपत्रे देणाऱ्या कंत्राटदराचे कंत्राट मंजूर केले असून हे सर्व राजकीय दबावातून व हेतुपुरस्पर आमच्यावर अन्याय केला. तसेच संबंधित कंत्राटदार नावापुरताच असून या मागे अनेक मोठे राजकीय कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख स्वप्नील मानकर व कंत्राटदार सुमेध सरदार यांनी केला.

 

चौकशी करून कारवाई करणार

संबंधित कंत्राटदाराला नोटीस देऊन त्यांच्याकडून याबाबतचा खुलासा घेण्यात येईल. तसेच त्यांचे कागदपत्रे तपासून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल. कोरोनामुळे शिवभोजन थाळी लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश वरिष्ठांचे असल्याने आपण तातडीने ही कारवाई केल्याचे मत तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी मांडले.

 

 

दोषी आढळल्यास होणार गुन्हा दाखल ?

सदर प्रकरणात कंत्राटदार दोषी आहे किंवा नाही हे तहसीलदारांच्या चौकशीअंती पुढे येणारच आहे. जर दोषी आढळल्यास ही फसवणुक शासनाची होणार आहे. त्यामुळे दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार का ? की केवळ कंत्राट रद्द होणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.