कडेपूर येथील डोंगरावर मंदिर परिसरात झाडांची चोरटी वाहतूक : ग्रामस्थांनी टेम्पो पकडला : वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव न्युज:

सांगली जिल्ह्यातील कडेपूर (ता.कडेगाव) येथील पर्यटन तिर्थक्षेत्र असलेल्या डोंगराई मंदिर परिसरातील झाडांची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे. रविवारी रात्री विनापरवाना तोडलेली झाडे चोरून भरून घेऊन जात असलेले टेम्पो ग्रामस्थांनी पकडले. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयित चोरटे आणि वाहन नंबर याबाबत माहिती देण्यात आली. मात्र गेले तीन दिवस झाले अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर आणि वनपाल आर.आर.पाटील या निष्क्रिय अधिकार्यांची बदली करण्याची मागणी उपवन संरक्षक प्रमोद धानके यांच्याकडे केली आहे.
कडेपूर येथील डोंगराई मंदिर हे जागृत देवस्थान आहे. येथे देशभरातून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी लोकवर्गणी आणि शासनाच्या विविध योजनामधून निधी उपलब्ध करुन मंदिर परिसरात मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड व सुशोभीकरण केले आहे. वृक्ष लागवडीमुळे उजाड डोंगर आता हिरव्यागार गर्द वनराईने बहरलेला आहे. या परिसरात चारा आणि पाण्याची सोय असल्याने वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे.
पर्यावरणाचा होत चाललेला -हास रोखण्यासाठी शासन वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. असे असताना डोंगराई मंदिर परिसरातील डोंगरावरील झाडांची मोठ्याप्रमाणात कत्तल करून चोरी केली जात आहे. रविवारी रात्री ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब यादव, अमर यादव, शाहीर यादव, अमोल शंकरराव यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन पीक अप टेम्पो तोडलेली झाडे भरून घेऊन जात असलेले पकडले. त्यापैकी एक टेम्पो पळून गेला. मात्र (एम.एच.११, ए.जी.३६९२) हा टेम्पो पकडला. त्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत तातडीने वनपाल आर.आर.पाटील यांना मोबाईलवरून माहिती दिली. तसेच त्यांना ताबडतोब घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र वनपाल पाटील यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्ही वाहनांचे नंबर लिहून घ्या, फोटो काढा. आपण उद्या सकाळी कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे नेते सतीशराव देशमुख, सरपंच रूपाली यादव, उपसरपंच संग्राम यादव, सदस्य लालासाहेब यादव, अमर यादव यांनी वनपाल पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी डोंगराई मंदिर परिसरात सातत्याने होत असलेली वृक्ष तोडी आणि रात्री पकडलेल्या वाहनाबाबत तक्रार करण्यात आली.
यावेळी वनपाल पाटील यांनी तुम्ही तक्रार केली. तर ती वाहने अडकून पडतील, जप्त होतील असे सांगितले. तसेच तुम्ही कोणी झाडे तोडून चोरून नेली त्यांची नावे घालून लेखी तक्रार द्या. मग आम्ही कारवाई करतो. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. कडेगाव वनक्षेत्रपाल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वृक्ष तोड करणाऱ्यावरती कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी याबाबत उपवनसंरक्षक प्रमोद धानके यांच्याकडे तक्रार केली आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत श्री.धानके यांनी सांगली येथून चौकशी अधिकारी पाठवून सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. असे असले तरी आपले कर्तव्य निभावण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कडेगाव येथील वनक्षेत्रपाल आणि वनपाल या निष्क्रिय अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.