*वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून गुगामल राष्ट्रीय उद्यानाची पाहणी* *स्पायडर म्युझियमला प्राधान्याने निधी देणार*

0
596
Google search engine
Google search engine

*वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून गुगामल राष्ट्रीय उद्यानाची पाहणी*

*स्पायडर म्युझियमला प्राधान्याने निधी देणार*

– *वन मंत्री संजय राठोड*

अमरावती, दि. १२ : चिखलदरा येथील स्पायडर म्युझियमच्या विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे
राज्याचे वनमंत्री संजय राठोड
यांनी आज चिखलदरा येथे सांगितले.

वनमंत्री श्री. राठोड यांनी आज
मेळघाटातील चिखलदरा येथे वन विभागाच्या कामांचा आढावा घेतला व वन प्रशिक्षण संस्था, स्पायडर म्युझियमलाही भेट दिली. त्याचप्रमाणे, वन मंत्र्यांनी
चिखलदराजवळील कोअर क्षेत्रातील वैराट शिखरावर वनसंरक्षणासाठी उभारलेल्या वायरलेस चौकीला भेट देऊन तेथील वनरक्षकांचे मनोबल वाढवले.
*मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.*

वन मंत्री श्री. राठोड म्हणाले की,
मेळघाटात स्पायडरच्या साडेचारशेहून अधिक जाती आहेत. त्याची पर्यावरणातील महत्वाची भूमिका लक्षात घेता संवर्धनाच्या, तसेच अभ्यासक, पर्यटक आदींसाठी स्पायडर म्युझियमच्या विकासाचा पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. या म्युझियमसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, वैराट पठारावरील गवत व कुरण विकासासाठी कॅम्पा फंडामधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कुरण विकासाने येथील तृणभक्षीय प्राण्यांची संख्या वाढेल व त्या अनुषंगाने वाघांची संख्याही वाढण्यास मदत होईल. त्यानुसार तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्यास वाघांच्या हस्तांतरणासाठी मेळघाटचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेतील मैदान विकासासह विविध सुविधा उभाराव्यात. जिल्हा नियोजन निधीत विकासासाठी प्रस्ताव द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील पांढरी येथील स्थानिक नागरिकांच्या निवेदनानुसार पशुचराईच्या क्षेत्राच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मेळघाटमधील विविध कामांची माहिती श्री. रेड्डी यांनी सादरीकरणातून दिली.