विना परवाना अवैध रेती वाहतुक करतांना आणखी एक ट्रॅक्टर जप्त दोन आरोपी अटकेत

0
589
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे तालुक्यात नदी – नाल्यांतून रेती चोरी सुरू असतांना आता या रेती माफीयांविरूध्द ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. यापुर्वी दोन ट्रॅक्टर जप्त करून गुन्हा दाखल केल्यानंतर आता पुन्हा एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. चांदूर रेल्वे तालुक्यातील भिलटेक – सोनोरा नाल्याजवळ विना परवाना अवैध रेती वाहतुक करतांना एक ट्रॅक्टर जप्त केला असुन दोन आरोपींना अटक केल्याची दबंग कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीसांनी मंगळवारी रात्री केली.

चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत एपीआय विक्रांत पाटील व वाहतूक पोलीस कर्मचारी मंगळवारी रात्री गस्ती वर असतांना भिलटेक – सोनोरा नाल्याजवळ एक ट्रॅक्टर क्र. एमएच २७ एल ५१४७ संशयास्पद आढळून आला. त्याला पोलीसांनी तपासले असता विना परवाना रेती वाहतुक करीत असल्याचे चालकाने सांगतिले. त्यानंतर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आला. आरोपी चालक वासुदेव मारोतराव शेंडे (४५) रा. सोनगाव व मालक निलेश रमेशराव भालेराव (३७) रा. मेटे कॉलनी विरूध्द भादंवी कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना बुधवारी चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक ठाणेदार विक्रांत पाटील करीत आहे. चांदूर रेल्वे पोलीसांच्या सततच्या कारवायामुळे रेती माफीयांमध्ये दहशत पसरल्याचे चित्र आहे.