*_निम्न पेढी प्रकल्पाची राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून पाहणी_*

0
1137
Google search engine
Google search engine

 

*प्रकल्प निर्मितीचे काम नियोजनपूर्वक वेळेत पूर्ण करा*
*-जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू*

*_45 गावांत 12 हजार 230 हेक्टरवर सिंचन सुविधा_*

अमरावती, दि. 16 : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील 39 गाव, अकोला जिल्ह्यात मुर्तीजापूर तालुक्यातीह सहा गावांना सुमारे 12 हजार 230 हेक्टर जमिनीवर शाश्वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रकल्प निर्माण होत असून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्ण करुन वेळेत प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी संबंधित अभियंताना दिले.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी रविवारी प्रत्यक्ष निम्न पेढी प्रकल्पाला भेट देऊन कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पेढी प्रकल्पाचे मुख्य अभियंता आ. तु. देवगडे, कार्यकारी अभियंता वि. भ. बागुल, उपविभागीय अभियंता ध. नि. नखाते, अ. रा. भुते आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी कार्यकारी अभियंता श्री. बागूल यांनी पेढी प्रकल्पा संदर्भात नियोजन व त्याअनुषंगाने सिंचन क्षेत्र याबाबत राज्यमंत्री श्री. कडू यांना माहिती दिली. प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या लाभ क्षेत्रात दाबयुक्त बंदिस्त वितरण प्रणालीव्दारे पाणी वाहून नेल्या जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण 45 गावांना सुमारे साडे बारा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रकल्प निर्मितीचे काम होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील 39 गाव, अकोला जिल्ह्यात मुर्तीजापूर तालुक्यातीह सहा गावांना सुमारे 12 हजार 230 हेक्टर जमिनीवर शाश्वत सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचा हिताचा प्रकल्प असल्याने त्याचे उत्तम नियोजन करुन वेळेत प्रकल्प पूर्ण करावे. पंपगृहासाठी विज आवश्यक असून त्यासाठी येणाऱ्या विजबिलाचा भार शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून त्याठिकाणी सौर उर्जा प्रकल्प प्रस्तावित करुन संपूर्ण योजना यावर चालविली जावी, तश्या पध्दतीचे उत्तम नियोजन करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी यावेळी दिले. प्रकल्प शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभदायी ठरावा यासाठी ठिबक‍ सिंचन किंवा तुषार सिंचन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी खात्याला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पाणी वाहून नेणारे पाईप जमिनीखाली टाकण्याचे प्रस्तावित असल्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावर राज्यमंत्री म्हणाले की, पाईप जमिनीखालून टाकण्याच्या कामासाठी आवश्यक असलेली जमिन काही कालावधीकरीता संबंधित शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळू शकेल, असे आवाहनही श्री. कडू यांनी यावेळी केले. सर्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यानुसार प्रकल्प निर्मितीचे अचूक नियोजन करुन प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

00000