*कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड दूर – अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या सेवा नियमित*

0
1486
Google search engine
Google search engine

 

*पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश*

अमरावती, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवांत तांत्रिक खंड पडल्याने सेवेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत पाठपुरावा केल्याने हा तांत्रिक खंड क्षमापीत करण्याबाबत निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. त्याचा लाभ या अभियंत्यांना होणार असून, विविध प्रशासकीय प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.

अभियंत्यांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले होते. त्यानुसार तत्काळ निर्णय निर्गमित झाला असून, अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.

१९९६ ते १९९८ दरम्यान नियुक्त झालेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या सेवेत खंड निर्माण झाला होता. सेवा खंड क्षमापीत करण्याचा कालावधी १५ दिवसाहून अधिक असू नये अशी अट होती. त्यावेळी ८० अभियंत्यांपैकी २४ अभियंत्यांच्या सेवा खंड अधीक्षक अभियंत्यांच्या स्तरावर क्षमापीत होऊ शकले. २२ अभियंत्यांच्या सेवा निधन , राजीनामा यामुळे संपुष्टात आल्या. तथापि, ३४ अभियंत्यांच्या सेवा खंडित स्वरूपात राहिल्या.

या अभियंत्यांच्या नियुक्ती प्रारंभी सेवायोजन कार्यालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात होत्या. त्यानंतर निवड मंडळाकडून सहा महिन्याची नियुक्ती करून काही काळ खंड ठेवण्यात आला व पुन्हा नियुक्ती देण्यात आली. त्यावेळी प्रशासकीय प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण न झाल्याने व निवडणूक आचारसंहिता असल्याने तांत्रिक खंड १५ दिवसापेक्षा जास्त झाला होता. याच प्रकारच्या काही अभियंत्यांचा सेवा खंड क्षमापीत करण्यात आला होता. त्यामुळे या अभियंत्यांच्या सेवेतील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहे व मूळ नियुक्तीनुसार या सर्वांची सेवा नियमित झाली आहे.