*दैनिक लोकसत्ताचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी मोहन अटाळकर यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार जाहीर*

0
1063
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १८:
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार १५ जणांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान येत्या २१ मे २०२१ ला करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकसत्ताचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी मोहन अटाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कृषी आणि सिंचनविषयक सातत्याने लिखाण करून शेती प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल मोहन अटाळकर यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. निवड समितीच्या अध्यक्ष पौर्णिमाताई सवाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृषिरत्न निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली.

मानवी समाजाच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी कायमचा जुंपलेला बळीराजा, आमचा पालक कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या कार्याची दखल घेतली पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २१ मे शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना समोर आली.

नेहमीच विपरीत परिस्थिती कमी भांडवल, कमी खर्चाची शेती करून शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या देशाच्या उत्पादनात वाढ करतोय. प्रोत्साहन आणि त्याच्या कर्तुत्वाला साष्टांग दंडवत म्हणजे “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार”होय.

अशा उपक्रमातून शेती संदर्भात विविध विषयावर चर्चा होते, आश्वासक तोडगा निघतो. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक जण समोर येतात. हीच या पुरस्काराची यशस्वीता ठरते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान २१ मे २०२१ ला करण्याचे ठरवले असून दिवंगत खासदार राजीव सातव यांना यंदाचा सोहळा समर्पित करण्यात आल्याची माहिती प्रकाश साबळे यांनी दिली.
—————————