सागर भाऊ देशमुख यांनी शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश, काँग्रेसला धक्का • उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घेतला प्रवेश

0
1044
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात एक प्रभावी युवा नेते म्हणून उदयास आलेले युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर देशमुख यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर आज त्यांनी शिवबंधन बांधून घेत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश घेतला असून त्यामुळे युवक काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.
मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सागर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, ….. तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

 


विद्यार्थी दशेपासूनच एनएसयूआय आणि त्यानंतर युवक काँग्रेसचे निर्वाचित प्रदेश सरचिटणीसपद असा युवा क्षेत्रातील दीर्घ तसेच संघर्षमय अनुभव सागर देशमुख यांचा आहे. विशेषत्वाने सर्वाधिक आंदोलने, मोर्चे तसेच सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी तसेच तरूणांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सागर देशमुख यांनी केलेली आंदोलने राज्यभर गाजली आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या गाडीवर चढून तत्कालीन सरकारविरोधातील आंदोलन असो किंवा मग पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधातील आंदोलन तसेच महाबीज महामंडळाविरोधातील आंदोलन यामुळे ते राज्यभरात आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सागर देशमुख हे अनेक वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये जोमाने कार्यरत असून त्यांच्याकडे विविध जिल्ह्यांचे ते निरीक्षक तसेच युवक काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे मुख्य समन्वयक पदाची देखील जबाबदारी त्यांच्याकडे होती. विविध जिल्ह्यातील तरूणांशी असलेला दांडगा जनसंपर्क तसेच सचोटीने एखादे काम तडाला नेण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांच्यातील जिद्द यामुळे राज्यभरात युवकांचे प्रभावी तसेच लाडके नेतृत्व म्हणून परिचित आहेत.

काँग्रेसमधील युवा नेतृत्वाला संधी केव्हा ?
काँग्रेसमध्ये युवा नेतृत्वाला योग्य संधी दिली जात नसल्यामुळेच सागर देशमुख यांच्यासारखे प्रभावी युवा नेतृत्व आज काँग्रेसने गमावल्याची भावना युवा वर्गात आहे. सागर देशमुख यांच्या व्यतिरीक्त अन्य कुणीही युवा नेता जिल्ह्यात आपली छाप उमटवू शकलेला नाही. तरीही त्यांना योग्य संधी दिली न गेल्यानेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असावा असा अंदाज आहे. नेत्यांच्या मुलांना जबाबदारी देण्यापलीकडे सर्वसामान्यांना पक्षात स्थान दिल्याशिवाय काँग्रेसमध्ये संघटन बांधणी होणार नाही याकडेही आता पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे.

दिली जाणार मोठी जबाबदारी

शिवसेनेत युवा सेनेत सद्यस्थितीत संघटनचे मजबूत बांधणी करण्यावर शिवसेनेचा भर असून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी सागर देशमुख यांच्यावर राज्य स्तरावरील मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. स्वत: आदित्य ठाकरे आणि सागर देशमुख यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतरच त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असून त्यामुळे सागर देशमुख यांच्याकडे आता संघटनेत मोठी जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. अमरावती जिल्ह्यासोबतच संपूर्ण विदर्भात सध्या युवा सेनेत असलेल्या नेतृत्वाची उणीव यामुळे भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

बाळासाहेबांचे स्वप्न साकार करू :- 
शिवसेनेत सुरूवातीपासूनच तळागाळातील कार्यकर्त्याला महत्वाचे स्थान आहे. तसेच नेतृत्वाची संधी देखील आहे. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात शिवशाही प्रस्थापित करून स्वराज्याची जी संकल्पना उभी केली होती. त्यानुसारच शिवसेनेचे कार्य पुन्हा एकदा आजच्या तरूण पिढीत रूजविण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेऊन करणार आहे. शिवेसेनेत येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने तरूणांची फळी उभी झालेली दिसेल हा मला विश्वास आहे. वरूण देसाई यांच्या खांद्याला खांदा लावून युवा सेनेचे काम मोठ्या ताकदीने करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
सागर देशमुख, युवा नेते, शिवसेना