हत्याप्रकरणी अटक आरोपींना ५ दिवसांचा पीसीआर, गारोडीपुरा व शिवाजी नगर परिसरात छावणीचे स्वरूप ; शहरात शांतता कायम

0
923
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे –

एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी नईम खान रहमान खान (वय ३५ वर्ष) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) पहाटे ३ वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे शहरातील गारोडीपुरा येथे घडली आहे. याप्रकरणी अटक चार आरोपींना शनिवारी चांदूूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना २८ सप्टेंबर पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी शहरात शांतता कायम होती. शहरातील गारोडीपुरा व शिवाजीनगर परिसरात ठाणेदार विलास कुलकर्णी यांचे नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

२१ सप्टेंबरला अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान मुख्य आरोपी नईम खान व इतर काही साथीदारांनी तिच्या घराजवळ सोडून निघून गेले होते. यानंतर पुन्हा १ तासाने पहाटे तीन वाजताच्या दरम्यान आरोपी नईम खान हा गारोडीपुरा येथे आला व शस्त्राचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करीत होता. याच दरम्यान आरोपींनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने छातीत वार करून तसेच डोळ्यावर मारून व दगड, काठीने मारून गंभीर जखमी करून नईमला जीवाने ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवित २४ तासांच्या आत मो. आशिक अब्दुल कादर (४२ वर्ष), अफजल खा युसुफ खा मदारी (२७ वर्ष), साजीद उमर उर्फ पप्पू फारूख शेख (वय ४१ वर्ष) व दिपक रतन पवार (वय २८ वर्ष) या चार आरोपींना अटक केली. गुन्हा संबंधाने विचारपूस करीत असतांना आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. मात्र नंतर सदर गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली. अटक चारही आरोपींना शनिवारी चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेनंतर गारोडीपुरा व शिवाजीनगर परिसरात तिवसा, कुऱ्हा, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापुर या पोलीस स्टेशनचे एकूण २८ कर्मचारी तसेच दंगा नियंत्रक पथकाचे १६ कर्मचारी व चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिवस – रात्र तैनात असुन या परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ श्री. जगदाळे यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी व पोलीस करीत आहे.

अपहरण प्रकरणातील दोघांचा सुगावा नाही

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील चार आरोपींपैकी एक आरोपी अतुल कुसराम याला अटक करण्यात आली. मात्र शेख अशफाक (वय ३६) व चांदूरवाडी येथील एक आरोपी असे दोघे आरोपी अजूनही फरारीतच असुन शनिवारी सुध्दा यांचा सुगावा लागलेला नाही.