अमरावती :- *सामाजिक न्याय विभागातर्फे 600 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप*

0
385
Google search engine
Google search engine

*अमरावती, दि. 20 :* सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाज्योतीतर्फे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पूर्व तयारी व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅबचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये व यापूर्वी जवळपास 600 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर यांच्यामार्फत JEE/NEET/MHT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसड, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, अंकुश मानकर, प्रविण गुल्हाने, सहायक आयुक्त माया केदार, विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन राज्य गीत गाण्यात आले.
आमदार प्रताप अडसड यांनी शिवाजी महाराजांचे विचार हे कोण्या जाती-धर्मापुरते मर्यादित नसून ते जाती धर्मापलीकडील होते. ते रयतेचे राजे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या सोयी-सुविधा व साधनांचा योग्य वापर करून आपले व देशाचे नावलौकीक वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार सुलभाताई खोडके यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री. गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्राचे सादरीकरण केले. आर.डी. आय.के. महाविद्यालयाचे अंकुश मानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत विचार मांडले.
कार्यक्रमास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती केदार यांनी तर आभार श्री. भेलाऊ यांनी मानले.