_चांदूर बाजार रेक पॉईंटचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश_ *सुरळीत खतपुरवठ्याबरोबरच कृषीआधारित उद्योग- व्यवसायांना चालना मिळेल* – *जिल्हाधिकारी विजय भाकरे*

0
984
Google search engine
Google search engine

 

अमरावती दि. 7 : चांदूर बाजार येथील रेल्वे रेक पॉईंटमुळे मेळघाटसारख्या दुर्गम भागात, तसेच बागायती क्षेत्र असलेल्या तालुक्यांना कमी वेळेत खताचा पुरवठा शक्य होईल. त्याचप्रमाणे, कृषीआधारित उद्योग-व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले.

जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठकीत चांदूर येथील रेक पॉईंटचे काम पूर्णत्वास नेण्याचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने जिल्हाधिका-यांनी तत्काळ भुसावळ येथील रेल्वे कमर्शिअल मॅनेजर यांना पत्र लिहून कामाला गती देण्याचे निर्देश दिले व आज चांदूर बाजार येथे भेट देऊन रेल्वे रेक पॉईंटच्या जागेची पाहणीही केली. रेल्वेचे असिस्टंट कमर्शिअल मॅनेजर अनिल बागडे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी राहूल सातपुते, तहसीलदार रूनय जक्कलवार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

या रेक पॉईंटमुळे दुर्गम व दूरच्या भागात सुरळीत खतपुरवठ्याबरोबरच कृषी आधारित उद्योग-व्यवसायांना लाभ होणार आहे. त्यामुळे हे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. विदर्भ 24  न्यूज , कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होईल, असे श्री. बागडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या असलेल्या बडनेरा व धामणगांव रेल्वे येथील रेक पॉईंटवर सिमेंट व अन्नधान्य वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर रासायनिक खत उतरविले किंवा चढविले जाते. त्यामुळे तालुक्यांना पुरवठा करण्यासाठी विलंब होतो. चांदूर बाजार येथील रेक पॉईंट कार्यरत झाल्यास दोन्ही रेक पॉईंटवरील ताण काही प्रमाणात कमी होईल व तालुक्यांना जलदपणे खत मिळेल.

*अंतर होणार कमी*

सध्याच्या रेक पाईंटवरून मेळघाटातील धारणीपर्यंतचे अंतर 170 कि.मी. व वरुडचे अंतर 100 कि.मी. आहे. चांदूर बाजार रेक पॉईंट कार्यान्वित झाल्यास बडनेरा रेक पॉईंटच्या तुलनेत धारणीचे अंतर 35 कि.मी. ने कमी होईल व वरुडचे अंतर 45 कि.मी. ने कमी होईल. चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी या तालुक्यांनाही खत वितरण करणे सोयीचे होणार आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने चांदूर बाजार येथील रेक पॉईंट शहरापासून थोड्या दूरच्या अंतरावर निर्माण करण्याचे नियोजन आहे. या पॉईंटमुळे स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध होईल.

*इतर पॉईंटचा ताण कमी होईल*

सद्य:स्थितीत अमरावती जिल्ह्यात धामणगांव रेल्वे येथील रेक पॉईंटवरुन जास्त प्रमाणात खतपुरवठा होतो. तेथील प्लॅटफॉर्म केवळ नऊ वॅगन क्षमतेचा आहे. या पॉईंटवरील ताण चांदूर बाजार येथील रेक पॉईंट कार्यरत झाल्यास कमी होईल. बडनेरा पॉईंटलाही खत उतरविल्यानंतर ट्रकमध्ये भरण्यासाठी केवळ 10 ते 4 अशी निर्धारित वेळ आहे. मात्र, चांदूर बाजार येथील पॉईंट निर्माण झाल्यामुळे बडनेरा येथील ताणही कमी होणार आहे व जिल्ह्यातील खतवितरणात सुरळीतता येईल.

बडनेरा येथील पॉईंटचा रस्ता, माथाडी कामगारांच्या समस्या आदींबाबत स्वत: जाऊन आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रेल्वे अधिकारी व कृषी अधिक्षक अधिका-यांना यावेळी दिले. जिल्हाधिका-यांनी कुरळपूर्णा येथे भेट देऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रात्यक्षिकाची पाहणीही केली.