रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे ?

0
981
Google search engine
Google search engine

या वर्षी ७.८.२०१७ या दिवशी रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकत्र असल्यामुळे समाजामध्ये रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांनी वेधकाळात, म्हणजेच रात्री १० वाजेपर्यंत रक्षाबंधन करावे, अशी माहिती पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांनी दिली आहे.

 

१. ग्रहण आणि वेधकाळ

७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. बाल, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी सायंकाळी ५ वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

२. उपवास असल्यास काय करावे ?

पौर्णिमा किंवा श्रावणी सोमवारचा उपवास असल्यास दुपारी एक वाजण्यापूर्वीच फलाहार करावा. सायंकाळी सोमवारची नित्य पूजा करून उपवास सोडत आहे, अशी प्रार्थना करून केवळ तीर्थ घेणे उचित होईल; कारण वेधकाळात भोजन निषिद्ध आहे.

३. रक्षाबंधन करण्याची योग्य वेळ

वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने रात्री १० वाजेपर्यंत रक्षाबंधन (राखी बांधणे) करता येईल. सकाळी ७.३० ते ९.०० वाजेपर्यंत राहूकाळ आणि पहाटेपासून सकाळी ११.०८ मिनिटांपर्यंत विष्टीकरण (भद्रा) असा अशुभ काळ आहे. यासाठी सकाळी ११.०८ पासून दुपारी १ वाजेपर्यंत (वेध चालू होण्यापूर्वी) रक्षाबंधन केल्यास अधिक लाभ होईल.

४. यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी असणारी ग्रहणे

यापूर्वी सोमवार ६.८.१९९० आणि शनिवार १६.८.२००८ या दिवशी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते, असे पंचांगकर्ते श्री. दाते यांनी सांगितले आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०१७)