मुलींचे प्रमाण कमी असलेल्या जिल्हयात ‘मुलगी वाचवा – मुलगी शिकवा’ जाणीव जागृती अभियान

0
756
Google search engine
Google search engine

मुलींचे प्रमाण कमी असलेल्या जिल्हयात ‘मुलगी वाचवा – मुलगी शिकवा’ जाणीव जागृती अभियान

ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक

बीड: नितीन ढाकणे, दिपक गित्ते 

दि. २३ —– मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हयात ‘ मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ जाणीव जागृती अभियान हाती घेण्यात आले असून या अंतर्गत चित्ररथ गावोगांवी जावून मुलींच्या जन्माविषयी जागृती निर्माण करत आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या “बेटी बचाव, बेटी पढाव” अभियानाचा पुढील टप्पा म्हणून महाराष्ट्रामध्ये महिला बाल विकास विभागाच्या वतीने ‘ मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ‘ जाणीव जागृती अभियान चित्ररथाची सुरुवात १९ मार्चपासून पासून झाली आहे. महाराष्ट्रातील मुलींचे लिंग गुणोत्तर कमी असलेल्या १६ पैकी १२ जिल्ह्यात म्हणजेच बीड , अहमदनगर , बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना, सोलापूर, पुणे, लातूर आणि परभणी  या जिल्ह्यात  सजवलेल्या चित्ररथाचा शुभारंभ वरील  जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला. या चित्ररथावर मुलींचे मूलभुत अधिकार आणि जन्मदर वाढवण्याबाबतची प्रतिज्ञा आणि चित्रफीत देखील सर्वत्र  प्रामुख्याने दर्शविण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवस हे अभियान सुरू राहणार असून त्याची यशस्वी सुरुवात झाली आहे.

*पंकजाताईंच्या प्रतिमेचेही औक्षण*

———————————–
महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे अभियान अतिशय लोकप्रिय ठरले असून सर्व स्तरातून त्यांच्या या अभिनव अभियानाचे कौतुक होत आहे.  मुलगी वाचवण्याचे लक्ष्य बाळगणाऱ्या ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रतिमेचे काही ठिकाणी कुंकूम तिलक लावून औक्षण करण्यात आले. हा चित्ररथ नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वाळूज गावामध्ये पोहोचला असता, तेथील आजी आजोबांनी या रथावरील चित्रफितीचे कौतुक केले आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा व तिला उत्तम शिक्षण देण्याचा निश्चय केला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा लोकसेवेच्या व्रताचा वारसा एक महिला असून देखील पुरुषांइतक्याच कणखरतेने ना. पंकजाताई मुंडे अगदी यशस्वीपणे चालवित आहेत अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत. अभियानातील चित्ररथाला मिळालेला जनतेचा उत्तम प्रतिसाद पाहता भविष्यात या जिल्ह्यांतील मुलींचे जन्मदराचे  गुणोत्तर निश्चित वाढेल आणि जनतेची मुलींबाबतची मानसिकता देखील बदलेल असे एकंदरीत वातावरण यामुळे बनले आहे.
●●●●