प्लास्टिक बंदी: शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यापार्‍यांचा भव्य मोर्चा

0
1318
Google search engine
Google search engine

बीड: दिपक गित्ते

राज्यात गुढी पाडव्यापासून राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून या संबंधीचा शासन निर्णयही जारी केला आहे. वास्तविक संपूर्ण प्लास्टिक बंदी झाल्यास याचा दुर्गामी परिणाम होणार असून किराणा व्यापारी, हॉटेल व्यवसायीक, धान्य दुकानदार, स्विट होम, फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, महिला गृह उद्योग, गारमेंट इंडस्ट्रीज, साडी-ड्रेस मटेरिअल आणि स्टेशनरी व कटलरी तसेच बेकरी चालक व्यापार्‍यांसमोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापार्‍यांना दिलासा द्यावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवार दि. 28 मार्च रोजी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहनही व्यापारी महासंघाने केले आहे. राज्यात वाढत्या प्लास्टिक कचर्‍यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याने राज्य सरकारने गुढी पाडव्यापासून संपूर्ण राज्यभरात टप्प्या-टप्प्याने संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक शासनाचा हा निर्णय जाचक आणि एकतर्फी असून या बाबत राज्यातील कुठल्याही व्यापारी महासंघाशी साधी चर्चा करण्यात आली नाही की त्यांचे म्हणणेही जाणून घेण्यात आलेले नाही. यापूर्वी राज्य शासनाने 2006 मध्ये असाच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. या दरम्यान 50 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशवी वापराला सुट दिली होती. मात्र आता एकाच वेळी संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय व्यापार्‍यांच्या आणि ग्राहकांच्या दृष्टीने जाचक असल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला आहे. म्हणूनच या महत्वाच्या विषयाकडे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवार दि. 28 मार्च 2018 रोजी सकाळी 9 वा. शहरातील सारडा कॅपीटल येथील एस.बी.आय. बँके समोरुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत व्यापार्‍यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाने पत्रकाद्वारे दिली आहे. या मोर्चा दरम्यान शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यापारी बंधू आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवणार आहेत. शहरातील व्यापार्‍यांनीही या मोर्चात आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी महासंघाने केली आहे.