महाराष्ट्रातील ट्रक चालकांना भेडसावत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत राजेंद्र फड यांचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना निवेदन

0
662
Google search engine
Google search engine
नाशिक,- :- उत्तम गिते-
महाराष्ट्रातील ट्रक चालकांना भेडसावत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर नुकत्याच आलेल्या अहवालातील निष्कर्ष प्रमाण मानून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या यासाठी भाजप नाशिक शहर वाहतूक आघाडीचे प्रमुख व नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन दिले आहे.
राजेंद्र फड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या वाढत्या अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेला वाहतूक उद्योग राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतो. पण या उद्योगामधील तणावग्रस्त व दिवसरात्र काम करणाऱ्या ट्रकचालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यांना शासनाने सुविधा देण्यासाठी महामार्गांवर विविध सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या एका माहिती नुसार, कँटर आयएमआरबीने कॅस्ट्रॉल इंडियासोबतच्या सहयोगाने १ हजाराहून अधिक ट्रकचालकांवर संशोधन केले. त्यावरून काढण्यात आलेले निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या संशोधनादरम्यान ट्रकचालकांना सामना कराव्या लागणाऱ्या कामाचे घातक स्वरूप व कामाच्या स्थितीशी संबंधित असू शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत माहिती घेण्यात आली आहे.
अहवालामध्ये ट्रकचालकांचे आरोग्य आणि आरोग्याची काळजी घेण्याप्रती त्यांची वैयक्तिक वृत्ती जाणून घेण्यासाठी ट्रकचालकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. अहवालाच्या मते ५० टक्क्यांहून अधिक ट्रकचालक ड्रायव्हिंग संबधित आरोग्यविषयक समस्यांचा सामना करतात. तर ६३ टक्के ट्रकचालक त्यांच्या जीवनात आरोग्याला फारसे महत्व देत नसल्याचेही आढळून आले आहे. कँटर आयएमआरबीने कॅस्ट्रॉल इंडियासोबतच्या सहयोगाने मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता येथील हजराहून अधिक ट्रकचालकांचे (मालक ड्रायव्हर्स आणि १०  ते १५ टन ट्रकांचे ड्रायव्हर्स) सर्वेक्षण करत हे संशोधन केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सामन्यत: कामाची अधिक वेळ, घर व कुटुंबापासून दीर्घकाळापर्यंत दूर आणि अवघड रस्ते व ड्रायव्हिंग स्थिती अशा समस्यांचा त्यांच्या आरोग्यावर व स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. ५० टक्के ट्रकचालकांना १२ तासाहून अधिकच्या काळात ट्रिप्स कराव्या लागतात आणि ४६ टक्के चालकांना न थांबता सलग सहा तासांहून अधिक काळ ड्राईव्ह करतात. यामधून लांब अंतरावर जाणाऱ्या व्यवसायिक चालकांची तणावग्रस्त शैली दिसून येते. वाहतूक उद्योगामध्ये मानसिक व शारीरिक फिटनेस राखणे अंत्यत महत्वाचे आहे. असे असले तरी गेल्या वर्षांमध्ये ६२ टक्के चालकांनी वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
ट्रकचालकांना बसण्याची ओबडधोबड पद्धत स्थिर पवित्रा, पाठ व मान्येच्या सतत मागे पुढे होणाऱ्या हालचाली आणि अवघडलेल्या जागेत काम करणे व झोपणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना तीव्र पाठदुखी, मानदुखी व सांधेदुखीचा उच्च धोका आहे. त्यामुळे चालकांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकार स्तरावर उपक्रम राबविण्यात येऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राजेंद्र फड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.