श्री हणमंतराव मोहिते ‘ आयडियल फार्मर ‘ पुरस्काराने सन्मानित- कोल्हापुरात वितरण : डॉ. डी. वाय.  पाटील , सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये

0
873
Google search engine
Google search engine
सांगली:-:हेमंत व्यास.

परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणाऱ्या मोहित्यांचे वडगाव ( ता. कडेगाव ) येथील हणमंतराव जनार्दन मोहिते या प्रयोगशील शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घेत आयडियल फौंडेशनने त्यांना पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते आयडियल फार्मर पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले.

कोल्हापूर येथील शाहू सांस्कृतिक मंदिर मध्ये आयडियल फौंडेशनच्या वतीने आयडियल फार्मर अवॉर्ड -२०१८ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला .पद्मश्री डॉ.डी वाय पाटील व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला .राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगरु डॉ.के.पी.विश्वनाथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मोहित्यांचे वडगाव ( ता. कडेगाव ) येथील हणमंतराव मोहिते यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून तालुक्यात ओळखले जाते. आपला देश हा कृषी प्रधान आहे व तो राहावा हाच त्यांचा ध्यास असतो. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेवून शासनाच्या योजना कशा पद्धतीने यशस्वी होतील यासाठी ते प्रयत्नशील असतात. अन्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती देणे आणि नव नवीन माहिती घेणे हा त्यांचा स्वभाव आहे.तब्बल ३६ एकर क्षेत्राचा शेतीचा डोलारा ते आपल्या कुटुंबियांच्या मदतीने सांभाळतात . बहुपिक पद्धतीत विक्रमी उत्पादन ते प्रतिवर्षी घेतात.त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला विहीर जोड प्रकल्प २०१२ मध्ये शासनाच्या मदतीशिवाय पूर्ण केला . त्यामध्ये ६ विहिरी,११ बोअर,१ शेततळे,ताकारी योजनेच्या कालव्याच्या पाण्याचे सायफन असा समावेश आहे.त्यासाठी त्यांना सुमारे ४२ लाख ₹ खर्च आला.त्यांनी वीज वितरणच्या लोड शेडिंग वरती मात करण्याकरिता अपारंपरिक ऊर्जेचा सौर पंम्प व पॉवर टिलर वरती तयार केलेल्या जनरेटर चा वापर केला आहे.स्वतः तयार केलेले हळदीचे संपूर्ण यांत्रिकी प्रोसेसिंग युनिटचा वापर ते करतात.त्यामध्ये हळद लागण यंत्र,हळद काढणी यंत्र , हळद शिजविणेसाठी लागणारा बॉयलर व हळद पॉलिश यंत्र असा समावेश आहे.
त्यांनी उत्पादित केलेल्या केळीची पाश्चात्य देशामध्ये निर्यात केली आहे. पेप्सी कंपनी च्या बटाटा या पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन ते नेहमी घेतात.जनावरांच्या चाऱ्यासाठी मका पीक ,सेंद्रिय शेतीसाठी देशी जनावरांचा मुक्तसंचार गोठा , जीवामृत,गांडूळ खत, दशपर्णी अर्कचा वापर सेंद्रीय शेतीसाठी करतात. माती ,पाणी व देठ प्रयोगशाळेत तपासणी करून कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खत नियोजन करतात.

त्यांनी शेततळ्यामध्ये मत्स्यनिर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. वि.का.स.सोसायटी व सोनहिरा दूध संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी काही वर्षे सांभाळली आहे.शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्काराने सोनहीरा खोऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.
कार्यक्रमास आयडियल फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश औताडे , डॉ. डी. एस. सावंत , अथणी शुगर्सचे उत्तम पाटील , सुभाष आर्वे , धर्मेंद्र फाळके , पंडितराव वाभळे , वैभव जाधव, रवींद्र पाटील यांच्यासह महाराष्ट्र , कर्नाटक मधील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर : मोहित्यांचे वडगाव येथील प्रयोगशील शेतकरी हणमंतराव मोहिते यांना डॉ. डी. वाय. पाटील , सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते ‘आयडियल फार्मर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.