फक्त एक फोन रोज वृद्ध आई वडिलांना सारखा फोन कशासाठी करायचा ?

0
861
Google search engine
Google search engine

नाशिक (प्रतिनिधी)

बाबा मला दर एक दोन दिवसाआड रात्री आठ साडेआठला फोन करतात. मी ऑफिसमधून येऊन स्वैपाकघरात असते. रात्रीचे जेवण, मागचे आवरणे, मुलाची सकाळची शाळा, त्याच्या डब्याची तयारी, दुस-या दिवशीचे ऑफिस, आमचे डबे हे सगळं ओळीने डोळ्यासमोर दिसत असतं. हातातले काम टाकून फोन घ्यायचा म्हणजे कपाळावर आठी उमटतेच. एकीकडे अपराध्यासारखंसुद्धा वाटतं. त्यांचे बोलून झाले की आईला बोलायचे असते. रोज रोज नवीन तरी काय बोलणार ? मी कानाला मोबाईल लावून, खांदा उंच करून तो पकडून एकीकडे कामे उरकत असते.
माझा दादा अमेरिकेत जाऊन तिथलाच होऊन गेला. मी ठाण्याला असते. आणि पुण्यात दोन बेडरुमच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये सत्तरी ओलांडलेले माझे आईबाबा रहातात. आईच्या भाषेत empty nesters. त्यांना सांगितले, इथे ठाण्यात फ्लॅट घ्या. पण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या आईबाबांना ते नाही पटत. (हो. मीसुद्धा पुण्याची माहेरवाशिण म्हणून तोरा मिरवतेच की.)
आज हा विचार मनात येताच मला गंमत वाटली. ठरवले, आज सरप्राईज देऊ या. घरी आल्यावर फ्रेश होऊन बाबांना फोन लावला.
“बाबा”
“काय झालं ग ?” एकदम धसकून त्यानी विचारलं. “काही problem नाही ना ?”
” अहो कुठे काय. आज म्हटले, तुम्हाला जरा सरप्राईज देते.”
“ओहो.” आवाजातला आनंद आणि आश्चर्य बाबा लपवूच शकले नाहीत. माझ्या डोळ्यात पाणीच आले एकदम. मग बोललो नेहमीचेच.
फोन ठेवल्यावर जाणवले, आपल्या म्हाता-या आईवडिलांच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतात. त्यांची पिढी तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम आहे. त्यांना फक्त आपले क्षेमकुशल जाणून घ्यायचे असते. भरभरून बोलायचे असते. त्यांच्यासाठी आपण तेवढेही करू शकत नाही का ? तिथपासून अनेकदा मी स्वतः होऊनच आईबाबांना फोन करते. त्यांचा आनंदभरला स्वर ऐकून दरवेळी पाणावणारे डोळे टिपण्यात समाधान आहे.

यामिनी लोहार- पाडळसे (जळगाव)

उत्तम गिते (नाशिक)